पावसाळी प्रेमाच्या चिंब ओल्या आठवणी,
इंद्रधनूचे सप्तरंग जपुनी ठेवले मनी.
घनदाट मेघांचा वर्षाव गेला लोटुनी,
प्रीतीचा तुझ्या गंध आला वाऱ्यासवे परतुनी.
पावसाळा गातो रिमझिम प्रीत- गीत गुंफुनी,
स्पर्शाविना फुलतो ऋतू वसंत तनी-मनी.
पावसाळी मृद्गंध शोधी, आठवणीतील गाणी,
साठवणीतील गीते ओठी साद घाली जीवनी.
पावसाळा आणतो क्षण सोबतीचे शोधुनी,
पारदर्शी सरी सांगती प्रेमाची अनोखी कहाणी.
शब्द होते गोठलेले नयनभाषा जाणुनी,
ओढ भेटीची पुरेशी उमटे गुलाबी हास्यातुनी.
गरजणाऱ्या धारा येऊनी गूज सांगते कानी,
क्षण वेचून घे सुखाचे पुन्हा न येती परतुनी.
वळण वाटा वेगळ्या की वाट वेगळी वळणातुनी,
पूर नद्यांचा लोटून गेला कित्येक प्रहरातुनी.
श्रावणातील जलधारा पुसती मनातील धुक्यांची दाटणी,
आठवणींचा बांध फुटला आसुसलेल्या लोचनी.
शांत सुंदर हिरवळ दाटली चहुकडे जाणुनी,
वाट अजुनी पाहते ही राधा बावरी होऊनी.
कवयित्री- सुवर्णा काशीकर
दिनांक -०१/०८/२०२६.