Saturday, 6 February 2021

नि:शब्द - भंडारा अग्नीकांड

(भंडारा येथील हृदय पिळवटून टाकणार्‍या घटने नंतर सुन्न झालेल्या आईच्या मनाचा विचार करतांना तिच्याच नि:शब्द भावनेतून उमटलेले शब्द तसेच गतप्राण झालेल्या त्या चिमुकल्या जिवांच्या शांतीसाठी वाहिलेली भाव शब्दांजली.)


शांत झाले सुन्न झाले

मन माझे बाळा .

धुरासवे विरला नाही

नियतीचा जीवघेणा घाला .

काय सांगू कसे सांगू

काय पदरी पडले?

आयुष्य माझेही तुझ्या सवे 

कधीच गुदमरून गेले. 


आग लागली धूर झाला

चर्चा फार झाली. 

भडकलेली माथे ही 

आता शांत झाली.

4 दिवस खंत करून 

दुनिया विसरून गेली. 

शब्द धीराचे सांगून काही 

आप्त मंडळी निघून गेली. 

काय सांगू कसे सांगू

काय पदरी पडले? 

आयुष्य माझेही तुझ्या सवे 

कधीच गुदमरून गेले. 


उदरात अनुभवले मी

तूला वाढताना .

फार हर्ष होई तुझा

स्पर्श जाणताना .

ऊर भरून येई मातृत्वाच्या 

कळा सोसताना .

प्रसुतीच्या वेदना ही फिक्या 

तुझा जन्म होतांना. 

काय सांगू कसे सांगू 

काय पदरी पडले? 

आयुष्य माझेही तुझ्या सवे 

कधीच गुदमरून गेले. 


जन्म तुझा होताच तान्हूल्या, 

तूला उराशी कवटाळावे वाटले.

तोडून सारे बंधन मनीचे, 

तूला जोजवावे वाटले.

तुझे रडणे, तुझे हसणे, 

हवेत विरुन गेले. 

रिता झाला पाळणा अन् 

रिते अंगण झाले .

काय सांगू कसे सांगू 

काय पदरी पडले .

आयुष्य माझेही तुझ्या सवे 

कधीच गुदमरून गेले. 


किती किती स्वप्नं मी 

होते रे पाहिले .

गोजिरवाण्या स्पर्शास तुझ्या 

मन वेडे आसुसलेले. 

बोबडे बोल तुझे 

ऐकायचे राहिले .

दुङूदुङू धावणे तुझे 

पहायचे राहीले .

काय सांगू कसे सांगू 

काय पदरी पडले? 

आयुष्य माझेही तुझ्या सवे 

कधीच गुदमरून गेले. 


साकडे देवाकडे मागते

रोजच तुझी आई रे.

'बाळ माझं गेलं' असा हंबरडा,

पून्हा कुठल्याही दारी नको रे.

तुलाच मागते बाळा

माफी मी रोज रे.

वाटे पेटीत नव्हे तर कुशीत माझ्या

असता तू सुखरूप रे.

माय बाप होऊनही आम्ही 

अभागी च राहिलो रे.

शापित त्या अग्नी चा दाह 

आजही सोसतो रे.

काय सांगू बाळा तूला 

पदरी काहीच नसे उरले .

आयुष्य माझेही तुझ्या सवे 

कधीच गुदमरून गेले .








No comments:

Post a Comment