Thursday, 29 January 2015

महाराष्ट्र माझा

बंधुभाव अन दुजाभाव सोबतीने सांभाळतो
सामाजिकतेचा खोटा आव, चेहऱ्यावर आणतो
जय जय महाराष्ट्र माझा मी गर्वाने म्हणतो।

'धुम्रपान निषेध ' वाक्य जोराने वाचतो।
तम्बाखू  घोटून तिथेच सिगारेट फुंकतो।
जय जय महाराष्ट्र माझा मी गर्वाने म्हणतो।

स्वच्छ्ता मोहीमेत कसा सक्रीय राहतो।
न चुकता रोज मात्र रस्त्यावर थुंकतो।
जय जय महाराष्ट्र माझा मी गर्वाने म्हणतो।

दीन -दुबळ्यांची तशी कीव फार करतो।
खिशात हात टाकूनी चार आणे शोधतो।
जय जय महाराष्ट्र माझा मी गर्वाने म्हणतो।

शिक्षणात आजही कसा आघाडी गाठतो।
जाती भेद टाळण्यास मात्र अपयशी ठरतो।
जय जय महाराष्ट्र माझा मी गर्वाने म्हणतो।

परभाषिकाचे स्वागत मोठ्या मानाने करतो।
अन मराठमोळी गरीबाला मी शुन्यात लेखतो।
जय जय महाराष्ट्र माझा मी गर्वाने म्हणतो।

No comments:

Post a Comment